पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित राहतात. मात्र, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमात मुंबई पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या अँटी-ड्रग फॉरेन्सिक वाहनाच्या मदतीने तरुणांची अमली पदार्थ सेवनाबाबत तपासणी केली. तपासणी करण्यात आलेल्या सुमारे ४० जणांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांबाबत काय माहिती?
पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांपैकी एक केनियाचा नागरिक असून, दुसरा भारतीय आहे. या दोघांनी नेमके कोणते अमली पदार्थ सेवन केले आणि त्यांना हे पदार्थ कुठून मिळाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अँटी-ड्रग फॉरेन्सिक वाहन म्हणजे काय?
अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले अँटी-नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन सुरू केले आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले होते. या वाहनाच्या माध्यमातून संशयास्पद पदार्थांची प्राथमिक तपासणी, नमुने गोळा करणे आणि घटनास्थळाचे फोटो तसेच व्हिडिओ पुरावे जमा करणे शक्य होते. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वाहन महत्त्वाचे ठरत आहे.
दिलजीतच्या कॉन्सर्टला धमकीचा ईमेल मिळाल्यामुळे पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. या ईमेलमध्ये कॉन्सर्टचे ठिकाण, महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली. कार्यक्रमासाठी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले होते. श्वान पथक, अँटी-नार्कोटिक्स सेल आणि साध्या वेशातील पोलिसांचीही मदत घेण्यात आली. रेसकोर्सच्या आसपास ५०० ते ७०० मीटरचा परिसर नो-कार झोन घोषित करण्यात आला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा