केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकारण तापले आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधीच ती भूमिका स्पष्ट केली असून त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, शरद पवार यांना पुन्हा इंडिया आघाडीमध्ये आणण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
मनधरणीची जबाबदारी ठाकरे आणि ममता यांच्यावर
शरद पवार यांच्या मनधरणीची महत्त्वाची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक असल्याने त्यांच्या मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा आघाडीसोबत आणण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. शेवटपर्यंत प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारपासून अधिवेशन; ३६० खासदारांची गरज
सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार असून त्यात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचे विधेयक पटलावर मांडण्यात येणार आहे. गेल्या वेळीही सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे ते होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता तीन दिवसीय अधिवेशनात पुन्हा एकदा हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे.
हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला संसदेतील एकूण ३६० खासदारांची गरज असून त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामध्ये डीएमकेचे २२ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेतील ८ खासदारांचे मत सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. शरद पवार हे स्वतः आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. मात्र, त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे आघाडीसाठी प्रत्येक खासदाराचे मत महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा