देशातील सर्वसामान्य नागरिकांना आगामी काही महिन्यांत पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक आर्थिक अहवालात याबाबत इशारा देण्यात आला आहे. हवामानातील बदल, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि लग्नसराईचा हंगाम या तीन प्रमुख कारणांमुळे महागाई वाढण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थापासून पेट्रोल-डिझेलपर्यंतच्या किमतीवर होऊ शकतो.
महागाई वाढण्याची तीन कारणे
यंदा देशात नोव्हेंबरपर्यंत सणांचा उत्साह कायम होता. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात बाजारात खाद्यपदार्थांसह कपडे, घरगुती वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढते. मागणीत वाढ झाल्याने या वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या दरांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर हवामानातील अनिश्चिततेमुळे कृषी उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंत वस्तू पोहोचवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामी, पुरवठा कमी झाल्यास वस्तूंच्या किमती आणखी वाढू शकतात. देशातील महागाईचा आणखी एक मोठा धोका आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि समुद्री मार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीच्या खर्चात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
दिलासा देणारे घटक कोणते?
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली नरमाई आणि रुपयातील मजबुती यामुळे महागाई काही प्रमाणात नियंत्रित राहू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. मात्र, एकीकडे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता, तर दुसरीकडे इंधन आणि वाहतूक खर्चातील वाढीचा धोका यामुळे आगामी काही महिने सर्वसामान्यांसाठी महागाईच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा