चीनच्या जमिनीखाली लपलेला सोन्याचा एक प्रचंड साठा उजेडात आला आहे. लियाओनिंग प्रांतातील दादोंगगौ भागात तब्बल १,४४४ टन सोने असल्याचा अधिकृत अंदाज चीनच्या नैसर्गिक साधनसंपत्ती मंत्रालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये जाहीर केला. खाण क्षेत्रातील ही शोधमोहीम चीनच्या इतिहासातील मोठी उपलब्धी मानली जात आहे. या साठ्याचे अंदाजित बाजारमूल्य इतके प्रचंड आहे की, आफ्रिकेतील अनेक देशांचा दोन ते तीन वर्षांचा सरकारी खर्च त्यातून भागू शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
## दादोंगगौ आणि वांगू — दोन मोठे साठे
दादोंगगौ येथे सोने असल्याचे संकेत १९८० च्या दशकातच मिळाले होते. त्या काळात डोंगराच्या कड्यांवर सोन्याचे छोटे संकेत दिसले, मात्र साठा मिळवणे खर्चिक असल्याचे मानले गेले. नंतरच्या संशोधनात हे विखुरलेले साठे एकाच मोठ्या आणि सलग पसरलेल्या खनिज क्षेत्राचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. हे क्षेत्र सुमारे ३,००० मीटर लांब आणि १,५०० मीटर रुंद आहे. नव्या सर्वेक्षणादरम्यान केलेल्या खोदकामात प्रत्येक बोरहोलमधून सोन्याचे पुरावे मिळाले. हुनान प्रांतातील वांगू येथेही १,००० टनांहून अधिक सोन्याचा साठा असण्याचा अंदाज आहे. मात्र हा आकडा अंदाजावर आधारित असून त्याची खात्री करण्यासाठी आणखी खोदकाम आणि भौगोलिक सर्वेक्षणाची गरज आहे.
## साठ्याचे अंदाजित मूल्य किती?
नोव्हेंबर २०२६ च्या अखेरीस सोन्याचा भाव सुमारे ३,५५० डॉलर प्रति ट्रॉय औंस मानला, तर दादोंगगौमधील सोन्याचे सैद्धांतिक मूल्य सुमारे १६५ अब्ज डॉलर इतके बसते. वांगूमधील संभाव्य साठ्याचे मूल्य सुमारे ११४ अब्ज डॉलर असू शकते. दोन्ही मिळून ही रक्कम सुमारे २७९ अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे २५ लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचते. ही रक्कम अनेक देशांचा वार्षिक सरकारी खर्च चालवण्यासाठी पुरेशी आहे. मात्र हे केवळ जमिनीतून उपलब्ध झाल्यानंतरचे अंदाजित बाजारमूल्य आहे; चीनला मिळणारी प्रत्यक्ष कमाई नाही. खाणकाम, प्रक्रिया, वाहतूक आणि इतर खर्च वजा केल्यानंतर प्रत्यक्ष आर्थिक फायदा किती होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा