३० नोव्हेंबर २०२१ रोजी मी पेन्सिलने काढलेले एक चित्र घेऊन त्यांच्या कार्यालयात पोहोचलो होतो. आयुष्याचा मोठा काळ लोकांच्या सुरक्षेसाठी समर्पित केलेल्या व्यक्तीला माझ्याकडून दिलेली ती एक छोटीशी भेट होती. त्यांना मी कधी भेटलोही नव्हतो; मला केवळ त्यांचे आभार मानायचे होते. पण अवघ्या आठ दिवसांनंतर त्यांच्यासोबत काढलेला तोच फोटो पाहून इतका हसतमुख आणि उत्साही माणूस अचानक आपल्यातून कसा निघून गेला, हे कोडे मला पडेल याची कल्पनाही नव्हती.
फील्ड मार्शल करिअप्पा यांचे जुने टेबल
जनरल बिपिन रावत यांची भेट घेतल्यानंतर मनात एक वेगळीच आत्मीयता निर्माण झाली. त्यांच्या आवाजात उत्साह होता आणि डोळ्यांत जीवनाबद्दलची दुर्मिळ इच्छाशक्ती होती. मात्र, त्या भेटीची सर्वांत खोलवर मनात कोरली गेलेली आठवण म्हणजे त्यांचा गणवेश किंवा त्यांचे पद नव्हे, तर त्यांच्या कार्यालयातील एक जुने लाकडी टेबल. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की, ते टेबल एकेकाळी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे होते. पुढे ते निरुपयोगी समजून एका बाजूला ठेवण्यात आले होते. जनरल रावत यांनी ते दुरुस्त करून घेतले आणि मोठ्या आदराने आपल्या कार्यालयात वापरायला सुरुवात केली. त्या टेबलाविषयी ते ज्या आपुलकीने सांगत होते, ते पाहून एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातील जुनी आठवण जपून ठेवलेल्या वस्तूबद्दल सांगत आहे, असे वाटत होते.
एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आपल्याआधी या देशाची सेवा केलेल्या माणसाची आठवण इतक्या प्रेमाने जपते, ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली. मी त्यांचे आभार मानायला गेलो होतो; पण नकळत ते मला दुसऱ्यांचा आदर कसा करावा, याचा धडा शिकवत होते. त्या जुन्या टेबलात असे काय होते? त्याची किंमत लाकडात नव्हती, तर त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींमध्ये होती. कधीकाळी त्या टेबलावर बसून कुणीतरी देशाच्या हिताचे निर्णय घेतले असतील. ते टेबल जपून ठेवून जनरल रावत हे त्या व्यक्तीची सेवा आणि योगदान यांची आठवण जिवंत ठेवत होते.
कृतज्ञता वेळेत व्यक्त करण्याचे महत्त्व
हेलिकॉप्टर दुर्घटनेची बातमी ऐकून त्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. माझे मन वारंवार त्याच कार्यालयात जाऊन पोहोचत होते. त्यांचा आवाज, त्यांचा उत्साह, ते जुने टेबल, मी काढलेले चित्र आणि आमचा एकत्रित फोटो… आमच्या भेटीपासून त्यांच्या जाण्यापर्यंत अवघे आठ दिवसांचे अंतर होते. तेव्हाच मनात एक प्रश्न निर्माण झाला. एखाद्या क्षणाचे महत्त्व तो क्षण निघून गेल्यानंतरच आपल्याला का कळते? आपण एखाद्याला भेटतो, गप्पा मारतो, हसतो आणि निरोप घेऊन निघून जातो. पुन्हा भेट होईल, असे गृहीत धरतो. आज जे बोलता आले नाही, ते पुढच्या भेटीत सांगता येईल, असे वाटते. कदाचित कृतज्ञतेचा सर्वांत खोल अर्थ म्हणजे एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर तिच्याविषयी चांगले बोलणे नव्हे, तर ती आपल्यासोबत असतानाच मनातील खरी भावना तिच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा