राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अमरावती जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शासनाने सुरू केलेल्या ई-केवायसी पडताळणी आणि अर्जांच्या छाननीनंतर जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार ४४९ महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. सुरुवातीला जिल्ह्यात ६ लाख ९५ हजार ३५० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या.
२२ हजार २९९ महिलांचा लाभ कायमचा बंद
पडताळणीत २२ हजार २९९ महिला अपात्र आढळल्याने त्यांचा आर्थिक लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अचानक आर्थिक आधार बंद झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
अपात्रतेची कारणं कोणती?
चारचाकी वाहन असणं, वयोमर्यादेची अट न पाळणं, एकाच कुटुंबात मर्यादेपेक्षा जास्त लाभार्थी असणं आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असणं, या कारणांमुळे उर्वरित महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की, केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही छाननी आवश्यक आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याचं काय?
दरम्यान, पात्र ठरलेल्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. प्रत्येकी १,५०० रुपये याप्रमाणे दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये खात्यात जमा झाले आहेत, मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबरबाबत अद्याप कोणतंही अपडेट नव्हतं. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा