केंद्र सरकार आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्याच्या तयारीत असतानाच, या प्रक्रियेतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संभाव्य भूमिकेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देशातील मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या विधेयकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आयोगात कोण असणार?
प्रस्तावित विधेयकातील कलम ३ नुसार, देशातील मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार एक स्वतंत्र पुनर्रचना आयोग स्थापन करणार आहे. या आयोगाच्या रचनेनुसार त्यामध्ये एकूण तीन सदस्य असतील. आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतील. त्यातील एक सदस्य देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले निवडणूक आयुक्त असतील. तर तिसरा सदस्य संबंधित राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी असतील. या तरतुदीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे स्वतः किंवा त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी या महत्त्वाच्या आयोगाचा भाग असू शकतात.
विरोधकांच्या निशाण्यावर असताना नवी जबाबदारी?
सध्या मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, आता देशाचा आगामी राजकीय नकाशा आणि मतदारसंघांची रचना ठरवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या आयोगातही त्यांची वर्णी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, संसदेच्या आगामी अधिवेशनाआधी आज दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सकाळी ११.३० वाजता घटक पक्ष एकत्र येतील. या बैठकीला कोणते पक्ष गैरहजर राहतात, यावर विधेयकाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना २९ तारखेला सकाळपर्यंत दिल्लीत पोहोचा, असा थेट संदेश दिला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा