महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भूमिकेवरून चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने समाजमाध्यमांवर एक पोस्ट प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही थेट प्रश्न विचारले आहेत. या पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
राज्यसभेचा पाठिंबा, मग भाजपला साथ का?
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, वयाच्या ८५ व्या वर्षी शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. इतकंच नाही, तर काँग्रेसने स्वतःच्या राज्यसभेच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून पवार यांना पाठिंबा दिला होता, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पवार यांना विचारलं आहे की, राज्यसभेसाठी पाठिंबा घेतला, मग आता भाजपला पाठिंबा का दिला जातोय?
मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही उपस्थित
डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यसभेसाठी दिलेल्या साथीची आठवण करून देत, भाजपला साथ देण्यामागचं कारण काय, असा सवाल काँग्रेसने पुन्हा एकदा विचारला आहे. या पोस्टवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या वादाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा