मतदारसंघ पुनर्रचनेवरील (डिलिमिटेशन) विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकारणात वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर इंडिया आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसने आता जाहीरपणे जुन्या मदतीची आठवण करून देत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादीची भूमिका आणि आघाडीतील मतभेद
जितेंद्र आव्हाड यांनी काल डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधेयक वाचल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मात्र या विधेयकाला जाहीर विरोध केला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी या मुद्द्यावर दुहेरी भूमिकेत दिसत असल्याने संभ्रम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
मार्च २०२६ मधील राज्यसभा निवडणुकीची आठवण
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये मार्च २०२६ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते, तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची गरज होती. काँग्रेसकडे १६ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला होता. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतीही अट न घालता सकारात्मक भूमिका घेतली.
काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेनेही पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. काँग्रेसच्या पोस्टनुसार, त्याच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष आता परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसने एक भावनिक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार यांना भक्कम आधार दिला होता,’ अशा शब्दांत काँग्रेसने राष्ट्रवादीला जुन्या मदतीची आठवण करून दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा