लोकसभा मतदारसंघांची सरसकट पुनर्रचना आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी यांची सांगड घालणारे घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा संसदेत येणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विस्तारित पावसाळी अधिवेशनात ते मांडले जाईल. एप्रिलमध्ये बहुमताचा आकडा गाठताना सरकारची दमछाक झाली होती. यावेळी मात्र राजकीय समीकरणे बदलली असून दोन तृतीयांश बहुमतासाठी लागणारी ३५२ मते मिळवण्याचे गणित दृष्टिपथात असल्याचे दिसते.
प्रादेशिक पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार
सरकारने प्रादेशिक पक्षांसोबतच लहान पक्षांच्या पाठबळाची चाचपणी केली आहे. विरोधी पक्षांतही खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांसारखे प्रादेशिक पक्ष ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडून विधेयकाच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे. द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दलासह अन्य काही पक्षही साथ देऊ शकतात. गणित पक्के झाल्यावरच सरकारने तातडीने हे अधिवेशन बोलावल्याचे भाजप सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ आणि २०५१ पर्यंत प्रतिनिधित्वाचे प्रमाण कायम ठेवण्याचा नवा प्रस्ताव आणून सरकारने द्रमुकला आपल्या बाजूने वळवण्याचे धोरण ठेवले आहे.
आकड्यांचे गणित काय सांगते?
आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. लोकसभेची सध्याची सदस्यसंख्या ५४० आहे. आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश बहुमतापेक्षा जास्त, म्हणजेच ३५८ खासदारांचा पाठिंबा असल्याचा सरकारचा दावा आहे.
आकडेवारीनुसार सरकारकडे ३२२ खासदार आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी आणखी ३६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज लागेल. द्रमुकसह वायएसआरसीपी आणि राष्ट्रवादी (शप) या पक्षांकडून अनुक्रमे चार व आठ खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो, असा सरकारचा दावा आहे. उर्वरित २४ पैकी द्रमुकच्या २२ खासदारांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६८ नुसार घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन अटी आवश्यक आहेत.
असे आहे गणित: लोकसभेची एकूण मंजूर सदस्यसंख्या ५४३; रिक्त जागा तीन; सध्याचे प्रभावी संख्याबळ ५४०; दोन तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक मते ३६०; प्रत्यक्ष मतदान ५२८ सदस्यांनी केले, तर बहुमतासाठी आवश्यक मते ३५२; ‘एनडीए’चे संख्याबळ ३२२; विधेयक मंजुरीसाठी ३६ खासदारांची गरज; वायएसआरसीपीचे चार, राष्ट्रवादी (शप) कडून आठ खासदार.
प्रतिक्रिया व्यक्त करा