जगातील सर्वांत मोठे आणि मौल्यवान माणिक म्हणून ‘एस्ट्रेला डी फुरा’ हे नाव प्रसिद्ध आहे. मोझांबिकमधील एका खाणीत सापडलेले हे माणिक न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध लिलावगृहात तब्बल ३४.८ दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे २८८ कोटी रुपयांना विकले गेले होते. लिलावाच्या इतिहासात विकला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि सर्वाधिक मौल्यवान माणिक ठरला आहे.
हे अद्भुत माणिक जुलै २०२२ मध्ये आफ्रिका खंडातील मोझांबिक देशातील मोन्टेपुएझ येथील फुरा जेम्स या खाण कंपनीला सापडले होते. खाणीतून बाहेर काढले तेव्हा या कच्च्या दगडाचे वजन तब्बल १०१ कॅरेट होते. पोर्तुगीज भाषेत ‘एस्ट्रेला डी फुरा’ याचा अर्थ ‘फुराचा तारा’ असा होतो.
खाणीतून लिलावापर्यंतचा प्रवास
या कच्च्या दगडावर जगभरातील तज्ज्ञ कारागिरांनी अतिशय नक्षीदार आणि कौशल्याने पैलू पाडले. या प्रक्रियेनंतर त्याचा अंतिम आकार ५५.२२ कॅरेटचा झाला. रत्नशास्त्रज्ञांच्या मते या माणकाचा रंग अतिशय दुर्मीळ मानला जाणारा ‘पिजन ब्लड’, म्हणजेच गडद लाल चुटूक असा आहे.
या माणकामध्ये कमालीची स्पष्टता असून त्यात अजिबात अशुद्धता किंवा तडे नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच्या रंगामुळे आणि शुद्धतेमुळे तो जगभरातील रत्नप्रेमींचे लक्ष वेधून घेतो.
आधीचा विक्रम मोडला
५५.२२ कॅरेट वजनाचा हा माणिक विकला जाताच त्याने यापूर्वीच्या ‘सनराईज रुबी’चा विक्रम मोडीत काढला. सनराईज रुबी २५.५९ कॅरेट वजनाचा होता आणि तो सुमारे ३०.३ दशलक्ष डॉलर्सना विकला गेला होता.
शतकातून किंवा हजारो वर्षांतून असा एखादाच नैसर्गिक मौल्यवान खजिना पृथ्वीच्या पोटातून बाहेर येतो, असे मत या प्रसंगी रत्नशास्त्रज्ञांनी व्यक्त केले. नैसर्गिक स्वरूपात सापडलेल्या कच्च्या माणकांमध्ये १२५.५ कॅरेटचा बर्मा रुबी आणि ‘प्रिन्स ऑफ बर्मा’ हे सर्वांत मोठे मानले जातात. मात्र पैलू पाडून उत्कृष्ट दागिन्याच्या स्वरूपात लिलाव झालेला ‘एस्ट्रेला डी फुरा’ हाच जगातील सर्वांत मोठा माणिक ठरला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा