दिवाळी संपली असून आता लवकरच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. लग्न म्हटलं की नवरा-नवरीच्या घरात आनंदाचे वातावरण असते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत खरेदी, मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाच्या विधींमध्ये दिवस कसे निघून जातात हे समजतही नाही. मात्र, लग्नानंतर सुरू होतो तो खऱ्या संसाराचा प्रवास.
चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी नसते. विशेषतः नव्या नवरीला लग्नानंतर नवीन घर, नवीन माणसे आणि नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. या काळात तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. मात्र, घर सांभाळताना स्वतःची ओळख, करिअर आणि आवडी-निवडी हरवू देऊ नयेत. लग्नानंतर सासरी जाताना नव्या नवरीने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
इतरांच्या बोलण्यावरून मत बनवू नका
लग्नानंतर काही नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक सासरच्या मंडळींबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतात. त्यामध्ये काही चांगल्या तर काही नकारात्मक गोष्टी असू शकतात. मात्र, इतरांच्या बोलण्यावरून सासरच्या माणसांबद्दल लगेच मत बनवू नका. त्यांच्यासोबत स्वतःचा अनुभव घ्या आणि त्यानुसार नात्यांमध्ये विश्वास निर्माण करा.
सून म्हणून घरातील काही जबाबदाऱ्या सांभाळणे महत्त्वाचे आहे. मात्र, या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचे करिअर, आवडीनिवडी आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी स्वतःवर घेण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट हळूहळू समजून घ्या आणि स्वतःसाठीही वेळ काढा.
स्वतःची ओळख आणि अपेक्षा जपा
माहेरी आपण अगदी मोकळेपणाने बोलतो आणि वागतो. मात्र, लग्नानंतर नवीन घरात जाताना तिथल्या माणसांचे स्वभाव आणि विचार समजून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला प्रत्येकाची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत समजून घ्या. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. यामुळे नवीन नात्यांमध्ये आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल.
शेवटी, आपल्या मर्यादा आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःच्या गरजा आणि मर्यादा योग्य शब्दांत मांडल्यास गैरसमज टाळता येतात आणि नव्या घरात आपले स्थान सहजपणे निर्माण होते. संयम, संवाद आणि स्वतःची ओळख जपली, तर नव्या संसाराची सुरुवात सुखाची होऊ शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा