नाशिकमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बैठकीदरम्यानच आले संदेश
बनावट खात्यावरून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना संदेश पाठवण्यात आले. प्रत्येकाकडे 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांना असे संदेश आले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र संदेशांची सत्यता तपासल्यानंतर हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने करण्यात आलेला फसवणुकीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीही असाच प्रकार
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी थायलंडच्या एका भ्रमणध्वनी क्रमांकावरून जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि अधिकृत छायाचित्र वापरून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या घटनेनंतर प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात आली असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारी अधिकारी किंवा वरिष्ठांच्या नावाने व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करणारे संदेश आल्यास त्यांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही रक्कम पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा