मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
## मुख्य मार्गावर वेळापत्रकात बदल
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गाच्या लोकल विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहारपासून पुन्हा धीम्या मार्गावर धावतील. घाटकोपरहून सकाळी १० वाजून १९ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गाच्या लोकल फेऱ्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवरच थांबतील.
## ट्रान्सहार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक राहील. या काळात ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर लोकल रद्द राहतील. ठाण्याहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून दुपारी ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या फेऱ्या रद्द राहतील. पनवेल, नेरुळ आणि वाशीहून सकाळी १० वाजून २५ मिनिटांपासून दुपारी ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या फेऱ्या रद्द होतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरेगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल हार्बर मार्गाच्या लोकल तसेच नेरुळ-बेलापूर-उरण दरम्यानची पोर्ट लाइन रविवारच्या वेळापत्रकानुसार धावेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा