रोहित पवार यांनी पुण्याला कठोर पालकमंत्री मिळायला हवा, असे विधान केले होते. सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्यासारखे काम जमत नाही, असेही ते म्हणाले होते. त्यावरून वाद पेटला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. आज रोहित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले.
दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण
एखादी व्यक्ती त्या पदावर बसलेली असते, ती पुरुष आहे की महिला हे महत्त्वाचे नाही, असे रोहित पवार म्हणाले. त्या पदावर बसल्यानंतर जी भूमिका घ्यायला पाहिजे, त्या पदाच्या माध्यमातून आपण सामान्य माणसाला न्याय देत असतो, असे त्यांनी सांगितले. काकींच्या बाबतीत आपण बोललो, त्याचे त्यांना वाईट वाटले असेल, तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे रोहित पवार म्हणाले. काल सुद्धा रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आपण काकींच्या बाबतीत बोललो असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जेव्हा होते, तेव्हा त्यांचा प्रशासनावर एक वचक होता. दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे आपण अनेकवेळा बोलून दाखवले आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि विनंती
एखादी व्यक्ती स्वतःची जागा निर्माण करू शकते. सुनेत्रा काकी स्वतःची जागा निर्माण करतील, असा विश्वास आपल्याला आहे, असे रोहित पवार म्हणाले. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेची हालाखीची परिस्थिती झाली आहे, त्यावर तो मुद्दा होता, असे त्यांनी सांगितले. जेव्हा एखादा नेता जातो, तेव्हा त्याच्यामागे पोलीस प्रशासन असते. त्याला धोका नसतो. पण त्रास सामान्य माणसाला होतो. त्यावर बोललो तर चुकीचे काय, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
पुण्याचे पोलीस आयुक्त भाजपचे नेते सोडले, तर कोणाचेच ऐकत नाहीत, असा आरोप रोहित पवार यांनी केला. पालकमंत्र्यांचे किती ऐकतात, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा, असे ते म्हणाले. पालकमंत्र्यांना ताकद द्यायची असेल, तर अधिकाऱ्यांनी ऐकले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण लोकांच्या बाजूने बोललो, हे पुणेकरांचे मत आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. परिस्थिती तशी वाईट झालेली आहे, अशी आपली भूमिका आहे, असे ते म्हणाले. अजितदादांना न्याय देण्यासाठी आंदोलन करा, अशी विनंती त्यांनी केली. पुणे रिंग रोडला दादांचे नाव देण्यासाठी आंदोलन करा, असेही ते म्हणाले. तुम्ही करत नसाल, तर आम्ही करतोय, त्याला पाठिंबा द्या, असे रोहित पवार म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा