जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना जिल्हा बँकेच्या महायुतीत एकही जागा मिळाली नाही. त्यांनी जागेची मागणी केली होती, मात्र ती मान्य झाली नाही. त्यामुळे पाटील नाराज झाले असून पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीनंतर मोठ्या निर्णयाची शक्यता
चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. महायुतीकडून जिल्हा बँकेच्या संदर्भात होणाऱ्या मेळाव्यांना पाटील उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसते.
गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना नाराजी दूर करण्यासाठी जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे केले, पण ते सर्व प्रयत्न फसले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. जागा मिळायला हवी होती, मात्र सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत, असेही ते म्हणाले. जागा मिळाली नाही म्हणून नाराजी असणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी मान्य केले. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतः एकनाथ शिंदे यामध्ये मध्यस्थी करणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा