पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणाऱ्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात दुपारी २.३० वाजता ही बैठक पार पडली.
पाणीपुरवठा आणि रस्ते सुधारणांवर भर
शहरातील विविध उपनगरांतील नागरी सुविधा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी व बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन आणि देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे आणि मामुर्डी या भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची कामे तसेच पावसाळी गटारांच्या साफसफाईच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्वच्छता, आरोग्य आणि सक्षमीकरणाचे निर्णय
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची दैनंदिन निगा, नालेसफाई, बांधकामाचा राडारोडा उचलणे आणि अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ पुरवण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, त्यांची कुटुंबे, बालके, युवा वर्ग आणि सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३८ सर्वेक्षणकर्त्यांच्या नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देत, त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला आहे. चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्क उद्यानांची केअरटेकरसह देखभाल करण्याची जबाबदारी १८ महिन्यांसाठी त्यांच्याकडे सोपवण्यास मान्यता देण्यात आली.
अग्निशमन दल सज्ज ठेवण्यासाठी अग्निशमन केंद्रांची संवाद यंत्रणा अधिक प्रभावी केली जाणार आहे. यासाठी व्हीएचएफ आणि पीओसी वॉकीटॉकी पुरवण्यासह वायरलेस यंत्रणेत सुधारणा केली जाणार आहे. वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीतील ब्लास्ट फ्रीझर उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभालीसाठीही निर्णय घेण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा