पुणे शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेने आता शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या बेकायदा होर्डिंग्जविरोधात मोहीम हाती घेतली आहे. चौका-चौकात आणि नाक्यांवर बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिका शहर विद्रुपीकरण पुरस्कार देत आहे. या वेगळ्या उपक्रमाचे पुणेकरांकडून स्वागत होत असून मुख्यमंत्र्यांनीही या मोहिमेची प्रशंसा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
पुण्यात अतिक्रमण आणि विशेषतः बेकायदा होर्डिंग्जविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाचे मनापासून अभिनंदन केले. रस्ते, पायवाटा आणि पायाभूत सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सहज वापरता आल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. नियम हे केवळ शासकीय कागदपत्रांमध्ये छापण्यासाठी नसून ते पाळण्यासाठीच असतात, आणि त्यांचा उद्देश सामान्य माणसाचे जीवन सुखकर करणे हाच असतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बेकायदा होर्डिंग्जची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही, ती सर्वत्र आहे. त्यामुळे अशा होर्डिंग्जविरोधात सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्याने स्वीकारलेली पुणेरी धाटणीची ही अभिनव संकल्पना कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला एक आगळेवेगळे आवाहन केले. उद्या त्यांच्या स्वतःच्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर पुरस्कारांच्या यादीत त्यांचेही नाव जाहीर करावे, असे ते म्हणाले.
नागपूरलाही इशारा
येत्या काळात नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यानिमित्ताने तिथेही बेकायदा होर्डिंग्जचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी नेहमी जनतेमध्ये दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नव्हे, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रतिक्रिया व्यक्त करा