नवीन घरात राहायला जाणाऱ्या किंवा नव्याने संसार सुरू करणाऱ्या कुटुंबांसमोर सध्या एक वेगळीच अडचण उभी राहिली आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या १४.२ किलोच्या नियमित गॅस सिलेंडरचे नवीन कनेक्शन मिळणे गेल्या काही महिन्यांपासून थांबले आहे. मार्च २०२६ पासून सरकारी तेल कंपन्यांनी या सिलेंडरसाठी नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली असून, अद्याप त्या निर्णयात बदल झालेला नाही.
इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस या तिन्ही कंपन्यांकडून सध्या १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचे नवीन कनेक्शन दिले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्यांच्या ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेतूनही या सिलेंडरचा पर्याय हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या नागरिकांना कनेक्शन मिळवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
७० हजार अर्ज प्रलंबित असल्याची माहिती
या निर्णयाचा फटका विशेषतः नवीन घरात जाणाऱ्या कुटुंबांना बसत आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूर या प्रमुख शहरांमध्येच सुमारे ७० हजार गॅस कनेक्शनचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. देशभरातही अशा अर्जांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.
सध्या नवीन कनेक्शनसाठी ५ किलो आणि १० किलोचे सिलेंडर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नियमित वापरासाठी १४.२ किलोच्या सिलेंडरला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसमोर त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. छोट्या सिलेंडरचे दर तुलनेने अधिक असल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
निर्णयामागची कारणे काय?
पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी पाइपद्वारे नैसर्गिक वायू वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचाही या निर्णयामागे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी मोठ्या सिलेंडरच्या नवीन कनेक्शनवर तात्पुरती स्थगिती आणल्याचे मानले जात आहे.
ही स्थगिती कधी उठणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नवीन कनेक्शनची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सध्या छोट्या सिलेंडरचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा