नागपुरात पतंग उडवण्यासाठी जीवघेणा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत वृत्तपत्रात सार्वजनिक सूचना जारी करून नागपूरकरांना आवाहन केले आहे. नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठा करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जाणार आहेत.
सूचनेनुसार, नागपुरात प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी २५ हजार रुपये दंड आकारला जाईल. उल्लंघन करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास दंडाची रक्कम त्या मुलाच्या पालकांकडून वसूल केली जाईल. विक्रेत्याकडून प्रत्येक उल्लंघनासाठी २ लाख ५० हजार रुपये दंड घेतला जाईल.
दंड न भरल्यास जमीन महसूल म्हणून वसुली
घटनास्थळी दंडाची रक्कम न भरल्यास १५ दिवसांच्या आत नोटीस दिली जाईल. त्यानंतरही १५ दिवसांत रक्कम न भरल्यास सक्षम अधिकाऱ्यांमार्फत ती जमीन महसूल म्हणून वसूल केली जाईल. त्यामुळे मांजाचा वापर करणाऱ्यांवर आर्थिक दंडाबरोबरच पुढील कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठा याबाबत काही तक्रार असल्यास ११२ या पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार करता येणार आहे. नागपूर सायबर पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सूचना
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्तालयाने सर्वसामान्य जनतेसाठी या सूचना जारी केल्या आहेत. नायलॉन मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांचे गळे कापल्याने ते गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या मांजामुळे काही दुचाकीस्वारांना प्राणही गमवावे लागले आहेत.
त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागांत चायनीज मांजा आणि नायलॉन मांजाची विक्री होत असून, दुकानदारांकडून छुप्या पद्धतीने या बंदी असलेल्या मांजाची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा