शिक्षणव्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्येच भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असेल, तर उद्याच्या पिढीला प्रामाणिकपणाचे धडे कोण देणार? हा प्रश्न शालार्थ आयडी घोटाळ्याने उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि वेतन प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून कथित बनावट नोंदी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये उचलण्यासाठी बनावट नियुक्त्या, मागील तारखेचे आदेश आणि संशयास्पद मान्यता यांचा आधार घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची व्याप्ती सुमारे दोन हजार शिक्षकांपर्यंत पोहोचल्याची माहिती असून, नाशिक विभागातील शिक्षकांची संख्या सुमारे १३०० पर्यंत आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले आहेत. सुमारे १५० ते १६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आहे.
घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी
एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होते, त्याला वैयक्तिक मान्यता मिळते, त्यानंतर शालार्थ आयडी तयार होतो आणि शासनाच्या तिजोरीतून नियमित वेतन सुरू होते. या प्रत्येक टप्प्यावर अधिकृत कागदपत्रे, पडताळणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची मंजुरी अपेक्षित असते. मग या प्रक्रियेत बनावट नोंदी झाल्या असतील, तर त्या कोणाच्या मदतीने झाल्या? नियुक्ती आदेशांची सत्यता कोणी तपासली? हे प्रश्न तपास यंत्रणांनीच नव्हे, तर शासनानेही स्वतःला विचारण्याची गरज आहे.
नाशिक विभागातील ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व शालार्थ प्रस्तावांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे. १,५३० कर्मचाऱ्यांच्या आदेशांची पडताळणी केल्याची माहिती आहे. यात वरिष्ठ शिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी, वेतन पथकातील कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कारवाई झाली. काही अधिकारी आणि संस्थाचालक कारागृहात आहेत, तर काहींच्या जामीन प्रक्रियेला न्यायालयीन अडथळे आले आहेत. मात्र, कोण दोषी, हे न्यायालयीन प्रक्रियेतूनच निश्चित झाले पाहिजे.
निर्दोष शिक्षकांना न्याय मिळायलाच हवा
सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे संशयास्पद नियुक्त्यांशी संबंधित शिक्षकांचे वेतन रोखले जात आहे. काही कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्याचीही माहिती आहे. बनावट नियुक्त्या करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि शासनाच्या पैशाची वसुलीही झाली पाहिजे.
परंतु नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची माहिती नसताना, नियमांनुसार नोकरी स्वीकारून वर्षानुवर्षे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे काय? कार्यालयीन मान्यता आणि वेतन मंजुरी देणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त कसे होऊ शकतात? प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी, नियुक्तीच्या वेळची कागदपत्रे, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि कर्मचाऱ्याचा सहभाग यांची कसून तपासणी झाली पाहिजे. दोषी आणि निर्दोष यांच्यात स्पष्ट सीमारेषा आखली गेली पाहिजे.
शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराला स्थान असू नये. शिक्षकांच्या नावाखाली शासनाची तिजोरी लुटणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. त्याचवेळी हजारो शिक्षकांच्या भवितव्याशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी खेळ होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. दोषींना शिक्षा, आर्थिक वसुली, प्रशासकीय जबाबदारी निश्चिती आणि निर्दोष कर्मचाऱ्यांना न्याय या चारही गोष्टी एकाच वेळी साध्य झाल्या पाहिजेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा