महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आणि त्याबदल्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी याआधीच या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधीला आपण उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच, केवळ दहा आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देत असेल, तर तो एक विक्रम ठरेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता.
राऊतांचे वक्तव्य आणि उपरोधिक टोला
संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका. मी वास्तवात जगते, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या वक्तव्याला उत्तर दिले. तसेच, मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक नंबर महत्त्वाचा असतो, असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली.
मॅजिक नंबर हाच मुख्यमंत्रीपदाचा निकष
अजित पवार यांची चाळीस वर्षांपूर्वीची विधाने ऐका. ज्यांच्याकडे मॅजिक नंबर असतो, तोच मुख्यमंत्री बनू शकतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. कोणी तरी बालिशपणे लिहित असेल, तर त्यावर मी काही बोलणे क्रमप्राप्त नाही. मी गंभीर राजकारणी आहे. त्यासाठीच बारामतीच्या मतदारांनी मला निवडून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत केवळ राजकीय विधानांपेक्षा सभागृहातील संख्याबळ महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला.
प्रतिक्रिया व्यक्त करा