भोपाळमधील गुरुकुल शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. आठवीत शिकणारा सूर्यांश गेल्या दोन वर्षांपासून हॉस्टेलमध्ये राहत होता. रात्री झोपलेला सूर्यांश सकाळी उठलाच नाही. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने डॉक्टरांना बोलावले. सूर्यांशला संजय गांधी स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
रुग्णालयाने प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाची क्रिया थांबल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूर्यांशच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
सूर्यांशच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेच्या आदल्या रात्री साडेआठच्या सुमारास हॉस्टेलमधील सर्व मुले झोपायला गेली होती. सकाळी मुलांना उठवण्यात आले, पण सूर्यांश उठला नाही. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. रात्री झोपल्यानंतर सूर्यांशची प्रकृती कशी बिघडली, त्याला नेमका कशाचा त्रास झाला, सकाळी त्याला किती वाजता उठवण्यात आले आणि रुग्णालयात किती वाजता नेण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा