बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आहेर चिंचोली येथील तलाठी कार्यालयात घुसून एका वाळू माफियाने तलाठ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
## जप्त केलेले साहित्य परत मागितले
आहेर चिंचोली परिसरातून सिंदफना नदीचे पात्र वाहते. या नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाचे काही साहित्य तलाठी विलास तपसे यांनी जप्त केले होते. याचाच राग मनात धरून तो माफिया थेट तपसे यांच्या कार्यालयात दाखल झाला. त्याने जप्त केलेले साहित्य परत देण्याची मागणी केली. मात्र, साहित्य परत करता येणार नाही, असे तपसे यांनी स्पष्ट सांगितले. त्यावर संतापलेल्या माफियाने हातातील लोखंडी रॉडने त्यांच्यावर मारहाण केली.
## जखमी तलाठ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार
या हल्ल्यात तलाठी विलास तपसे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेचा निषेध केला असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. कार्यालयात घुसून सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा