स्वयंपाकघरातील काम सोपे करणारे एक अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चीनमधून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गॅस स्टोव्हवर ठेवलेली कढई कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून हलताना आणि फिरताना दिसत आहे. त्यातील हिरव्या पालेभाज्या सतत वर-खाली उडत असून, पहिल्या नजरेत एखादा स्वयंपाकी समोर उभा राहून भाजी परतत असल्याचा भास होतो. मात्र व्हिडीओमध्ये आजूबाजूला कोणीही व्यक्ती दिसत नाही.
उपस्थितांनी मोबाईलवर टिपले दृश्य
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये शेफ कढईला हिसका देऊन भाज्या हवेत उडवून पुन्हा कढईत टाकतात, हे दृश्य अनेकांनी पाहिले असेल. मात्र या व्हिडीओत तेच काम कोणत्याही माणसाशिवाय होताना दिसते. कढईची ही हालचाल पाहण्यासाठी तेथे उपस्थित असलेले लोक उत्सुक दिसत असून, अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल फोनवरून रेकॉर्ड केले आहे. या कढईची हालचाल पाहून स्वयंपाकाचे काम सोपे करण्यासाठी यंत्रांचा वापर किती पुढे गेला आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ऑटोमॅटिक कुकिंग आणि रोबोटिक तंत्रज्ञानाबाबत आपली मते मांडली आहेत. काही वापरकर्त्यांनी गंमतीने म्हटले आहे की, आता कढईच स्वयंपाकी बनली आहे.
भविष्यातील स्वयंपाकघर कसे असेल?
आतापर्यंत भाजी चिरण्यापासून ते मसाले घालण्यापर्यंत आणि ती नीट शिजवण्यापर्यंत प्रत्येक कामात माणसाची गरज भासते. मात्र ऑटोमॅटिक कुकिंग सिस्टीममुळे ही मेहनत कमी होऊ शकते. अशी यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली, तर रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या स्वयंपाकघरातील कामाची पद्धतही बदलू शकते. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या यंत्राचे संपूर्ण तंत्रज्ञान आणि त्याच्या क्षमतेबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तरीही या व्हिडीओने भविष्यात स्वयंपाकघरातील कामात किती मोठा बदल होणार आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा