दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पशुधनासमोर चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. गोठ्यातील जनावरे उपाशी राहिली, तर शेतकऱ्याचे कुटुंब आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दोन्ही अडचणीत येतील, अशी भीती व्यक्त होत आहे. सहा नोव्हेंबरच्या शासन निर्णयाने चारा लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ मिळाले आहे. त्यामुळे आता कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोजगार हमीतून चारा लागवडीची संधी
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत, तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत गायरान जमिनीवर आणि वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर चारा लागवड करता येईल. यापूर्वीच्या पिकांखेरीज मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूण घास, ज्वारी मल्टिकट आणि जायंट बाजरा यांचा समावेश करण्यात आला आहे. एक हेक्टर मक्यासाठी ४७,३०७ रुपयांचे अंदाजपत्रक असून त्यात कुट्टी आणि मुरघास बॅगचाही समावेश आहे. यातील ६३ ते ७५ टक्के रक्कम अकुशल मजुरीची आहे. म्हणजेच चारा तयार होईल आणि त्याचबरोबर रोजगारही मिळेल.
चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी गावातील गोठ्यांची संख्या आणि जनावरांचे वय लक्षात घेऊन दरमहा लागणाऱ्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची आकडेवारी कृषी विभागाला मिळाल्यास लागवडीचे नियोजन सोपे होईल. सहायक आयुक्त, तसेच तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्या कार्यालयाला प्रथमच कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्तांकडे स्वतंत्र वित्तीय अधिकार नाहीत आणि कार्यालयात लेखापाल हे पदही नाही. याशिवाय रोजगार हमी योजनेंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणावरील कामे या विभागाने यापूर्वी कधी राबवलेली नाहीत. त्यामुळे अनुभव आणि कार्यपद्धतीही अवगत नाही. दोन्ही विभागांची क्षमता आणि आस्थापना वेगळी असताना जबाबदारी मात्र समान ठेवणे अडचणीचे ठरू शकते. या बाबीचा विचार करावा लागेल आणि संबंधित यंत्रणेला व्हीबीग्रामजीएसओएफटी प्रणालीवर तातडीने लॉगिन मिळणे आवश्यक आहे.
तालुका स्तरावर अंमलबजावणी आणि साठवणुकीचे नियोजन
चारा उत्पादक आणि कंपन्यांना टंचाईग्रस्त भागातील पशुपालकांशी जोडण्यासाठी तालुका स्तरावर चारा व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केल्यास अंमलबजावणीला गती मिळेल. मुरघास व साठा या बाबतीत पशुसंवर्धन विभागाने आणि काही सेवाभावी संस्थांनी जागृती केली आहे. हिरवा चारा मुरघासाद्वारे टिकवण्याचे तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोहोचवावे लागेल. परिस्थिती गंभीर झाल्यास चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्या लागल्या, तर हा साठा उपयोगात येईल. सोबत अझोला व हायड्रोपोनिक चाऱ्याबाबत जनजागृतीही सुरू ठेवावी. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, आयसीएआर आणि कृषी विज्ञान केंद्रांमार्फत बियाणे वेळेत उपलब्ध व्हायला हवेत. प्रत्येक तालुक्यासाठी लागवड क्षेत्र निश्चित केल्यास दृश्य परिणाम चांगले राहतील. गायरान, तालुका बीज गुणन केंद्रे, कृषी विद्यापीठांची प्रक्षेत्रे आणि पडीक शासकीय जमिनींवर रब्बी हंगामात प्राधान्याने चारा लागवड करून प्रात्यक्षिक प्लॉटद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे लागेल आणि प्रशिक्षण द्यावे लागेल.
ही कार्यप्रणाली राबवण्यासाठी कृषी पर्यवेक्षक तांत्रिक मान्यता देतील, तर तालुका कृषी अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि ऑनलाईन देयके वेळेत होतील, याची काळजी घ्यावी लागेल. रोजगार हमी योजनेत मजुरांकडून होणारी कामे यंत्रांनी करता येत नाहीत. मात्र, कस्टम हायरिंग सेंटरकडील कुट्टी व बेलर यंत्रांची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिल्यास योजनेबाहेरील पीक अवशेषांचे चाऱ्यात रूपांतर करता येईल. पेरणी किती झाली आणि किती टन चारा तयार होणार, याचा साप्ताहिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला दिल्यास एक सुसूत्रता येईल. दोन्ही विभागांमधील संवाद आणि माहितीची देवाणघेवाण यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती स्थापन करावी. त्यामध्ये ग्रामपंचायत, कृषी आणि पशुसंवर्धन या तीनही यंत्रणा असाव्यात. समितीने दर पंधरा दिवसांनी चारा उपलब्धता, बियाणे पुरवठा आणि कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.
पशुसंवर्धन विभागाने मागणी आणि वितरण अचूक सांभाळावे, तर कृषी विभागाने उत्पादन आणि तंत्रज्ञान भक्कम ठेवावे. एकाच रथाच्या दोन चाकांप्रमाणे दोन्ही यंत्रणा एकमेकांच्या साथीने धावल्या, तर दुष्काळात एकाही मुक्या जनावराला चाऱ्याअभावी उपाशी राहावे लागणार नाही, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा