चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील साठगाव गावात राहणारे मंगेश पांडव शेताच्या बांधावर बसून आपली व्यथा सांगत होते. त्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं, पण पैशाअभावी ते अर्धवटच राहिलं.
मजुरीच्या पैशांतून घर पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शेतकरी व्हायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी १७ हजार रुपये एकर या दरानं वीस एकर शेती तीन लाख चाळीस हजार रुपयांना भाड्यानं घेतली. शेतीसाठी एकूण साडेनऊ ते पावणेदहा लाख रुपये खर्च आला. त्यासाठी त्यांनी साडेसात लाख रुपयांचं कर्ज घेतलं.
पांडव यांच्याकडे स्वतःचे दोन लाख रुपये होते. त्यातून काही भाडं दिलं. त्यानंतर तीन सूक्ष्म वित्त संस्थांकडून कर्ज घेतलं, बचत गटांकडून तीन लाख चाळीस हजार रुपये घेतले आणि दलालाकडून दीड लाख रुपये आणले. असा सगळा पैसा त्यांनी शेतीत गुंतवला.
पण यंदा दुष्काळानं पिकांची वाट लावली. वीस एकरांपैकी एका एकरात भात लावला होता, बाकी शेतात कापूस आहे. भाताची उंचीच वाढली नाही. काही ठिकाणी लोंब्या आल्या, पण त्यात तांदूळ दिसत नाही. कापणीचा खर्चही परवडणार नाही, म्हणून भाताचं पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी तसंच सोडून दिलं.
कापसाची अवस्थाही वेगळी नाही. झाडांची उंची चांगली वाढली, पण पाहिजे तेवढी बोंडं लागली नाहीत. पावसाअभावी काही ठिकाणी फुलं-पाती गळून पडली, तर झाडं सुकायला लागली आहेत. चार एकर शेतात पाण्याची सोय आहे, पण तिथल्या कापसावर रोग आला आहे. त्यामुळे तिथंही उत्पन्न होईल की नाही, याची शंका आहे.
या सगळ्या खर्चाच्या तुलनेत निम्मंही उत्पन्न होणार नाही, अशी परिस्थिती आहे. मग कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, घराचा प्रपंच कसा चालवायचा आणि नागपूरला शिकणाऱ्या मुलांचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पांडव यांच्यासमोर उभा आहे.
भाडेकरू शेतकऱ्याला मदत का मिळत नाही
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं नुकसानभरपाई जाहीर केली आहे. पण ती पांडव यांना मिळणार नाही. कारण त्यांनी शेती भाड्यानं घेतली असली, तरी त्याचा कागदोपत्री भाडेकरार केलेला नाही. नुकसानभरपाईचे पैसे सातबारा ज्यांच्या नावावर आहे, त्या मूळ जमीनमालकाला मिळाले आहेत.
महाराष्ट्रात ज्याच्या नावावर सातबारा आहे, त्यालाच सरकारी नोंदींमध्ये शेतकरी म्हणून ओळख मिळते. त्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे नुकसान झाल्यास मदतही प्रामुख्याने जमीनमालकाच्या नावावर दिली जाते. प्रत्यक्ष शेती करणारा भाडेकरू मात्र या मदतीपासून वंचित राहतो.
पांडव यांच्यासारखे अनेक लोक भाड्यानं जमीन घेऊन शेती करतात. काही अल्पभूधारक शेतकरीही स्वतःच्या शेतीसोबत दुसऱ्याची शेती भाड्यानं घेऊन करतात. नुकसानभरपाईचा लाभ मिळवण्यासाठी भाडेकरार करणं महत्त्वाचं असल्याचं या प्रकरणातून समोर आलं आहे.
राज्याच्या महसूल विभागानं मे २०२६ मध्ये एक पत्रक काढून भाड्यानं शेती करणाऱ्यांनी भाडेकरार करणं बंधनकारक असल्याचा नियम केला होता. कूळ कायद्यावर या नियमांचा काही परिणाम होणार नाही, असंही त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. प्रत्येक तहसीलदारानं या नियमाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
पुढील हंगामात मदतीचं आश्वासन
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, या हंगामात भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी मदतीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र येणाऱ्या हंगामात त्यांना मदत कशी देता येईल, यासाठी तरतूद केली जाईल. त्यासाठी भाडेपट्ट्याची अधिकृत कागदपत्रं असणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी आवाहन केलं की, जमीन ठेक्यानं देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून जी मदत मिळते, ती त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ठेकेदाराला द्यावी. सर्वेक्षण करताना पटवाऱ्याला जमीन कोणी ठेक्यानं केली आहे, हे कळू शकतं. त्यामुळे ती मदत थेट ठेकेदाराच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही सरकारनं वेगळ्या उपाययोजना करायला हव्यात, असंही ते म्हणाले.
पांडव म्हणतात की, नुकसानभरपाईचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला हवेत. सातबारा मूळ मालकाच्या नावावर असला, तरी रोटावेटर फिरवणं, फवारणी करणं आणि पीक घेणं यासह सगळा खर्च ते स्वतः करतात. त्यामुळे खरं नुकसान त्यांचंच झालं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा