, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

भिवंडीत मॅनहोल सफाईदरम्यान दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

भिवंडीत मॅनहोल सफाई करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. सुरक्षा साधने न देता आत उतरवल्याचा आरोप करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे.

भिवंडीत मॅनहोल सफाईदरम्यान दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

भिवंडी शहरातील कामतघर फेणेपाडा परिसरात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. भुयारी गटाराच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी आत उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत कामगारांची नावे सुरज अशोक धोत्रे (वय २०) आणि शमशाद अब्दुल जब्बार मोमिन ऊर्फ अक्कू (वय ५५) अशी आहेत.

घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी धावून आले. पथकाने मॅनहोलमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना आत उतरवल्याचा आरोप

भिवंडी शहरात भुयारी गटार योजना टाकण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून ईगल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करत आहे. हे काम आजही अपूर्ण आहे. कामतघर फेणेपाडा रस्त्यावरील गटाराची वाहिनी चोकअप झाल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला चाचणी व परीक्षण करून काम पूर्ण करून हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठेकेदाराने हे काम स्थानिक कामगार शमशाद ऊर्फ अक्कू यांच्याकडे सोपवले होते.

त्यानंतर अक्कू यांनी आपल्या ओळखीच्या कामगारांना घेऊन फेणेपाडा परिसरातील गटाराचे मॅनहोल उघडून स्वच्छता सुरू केली. यावेळी कोणतीही सुरक्षा न बाळगता सुरज अशोक धोत्रे हे मॅनहोलमध्ये उतरले. आत गेल्यावर त्यांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अक्कू यांनी केशव या कामगाराला सांगितले, पण ते घाबरले. त्यामुळे अक्कू स्वतः सुरज यांना वाचवण्यासाठी रस्सी पकडून खाली गेले. मात्र त्यांनाही गुदमरल्यामुळे रस्सी सुटली आणि ते खाली पडले. त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती नगरसेवक कमलाकर पाटील यांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ही घटना घडून गेल्यानंतर सुमारे एक तासाने याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला आणि प्रशासनाला समजली. ठेकेदाराकडून येथील गटाराचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केला आहे. हे काम करताना ज्या सुरक्षा साहित्यांचा वापर करणे गरजेचे होते, ती कामगारांना न देताच त्यांना मॅनहोलमध्ये उतरवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे दोघा कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance