बऱ्याचदा अनेक प्रयत्न करूनही चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. चपात्या थोडा वेळ ठेवल्या तरी वातड होतात आणि वातड चपात्या कोणालाही खायला आवडत नाहीत. चपाती तयार करताना अनेक बदल करूनही ती वातडच राहते, अशावेळी पीठ मळण्याच्या आणि भाजण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केला तर चपात्या वातड होणार नाहीत. विशेष म्हणजे चपाती लवकर शिळीही होणार नाही. काही सोप्या टिप्स वापरून मऊ आणि फुगलेल्या चपात्या सहज तयार करता येतात.
पीठ मळण्याची योग्य पद्धत
चपात्यांसाठी २ कप गव्हाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका आणि पीठात २ ते ३ चमचे तेल टाका. त्यात पाणी अंदाजे १ कप ते दीड कप टाकायचे आहे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाणी एकदाच टाकू नका, थोडे थोडे टाका. बऱ्याचदा आपल्याकडून हीच चूक होते की आपण पाणी एकदाच टाकतो. पाणी थोडे थोडे टाकून पीठ चांगले मळण्यासाठी ७ ते ८ मिनिटे पीठ मळून घ्या. पीठ मऊ झाले पाहिजे, पीठ कडक अजिबात नको. त्यानंतर ३ ते ४ मिनिटे तेल टाकून पुन्हा पीठ चांगले मळून घ्या. हे सर्व झाल्यानंतर ५ ते १० मिनिटे पीठ चांगले झाकून ठेवा. दोन्ही हातांना थोडेसे तेल लावून घ्या आणि पोळ्यांकरिता गोळे तयार करा. पीठ लावून हळूहळू लाटून घ्या. पुरीएवढी चपाती झाली की त्याला तेल लावा आणि त्याचा पेढा तयार करा. त्यानंतर काटाने लाटा. मध्यभागी कधीच जास्त चपाती लाटू नका, चपात्या व्यवस्थित होण्यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे.
भाजताना लक्षात ठेवा
तव्यावर चपाती टाकताना तवा फार जास्त गरम नसावा. मध्यम आचेवर चपाती शेकून घ्या. त्यानंतर वारंवार चपाती पलटण्याच्या भानगडीत पडू नका. जास्त चपाती पलटली की ती फुगत नाही. प्रत्येक बाजू सुमारे ११ सेकंद भाजू द्या आणि दोन्ही बाजूंनी चपाती छान भाजू द्या. तुम्हाला तेल लावायचे असेल तर तुम्ही तेल लावू शकता, नको असल्यास तेल नका लावू. एकदम मंद आचेवर चपात्या भाजू नका. जे लोक डाएट करतात, त्यांनी तेल लावू नये. हॉट बॉक्समध्ये चपाती ठेवताना झाकण पूर्ण बंद करू नका, त्यामुळे चपातीला पाणी सुटू शकते. या छोट्या बदलांमुळे चपात्या मऊ, लुसलुशीत आणि फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या होतील.
प्रतिक्रिया व्यक्त करा