, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा निर्णय

प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती मागवून प्रायोगिक अंमलबजावणीनंतर राज्यभर विस्तार होईल.

प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा निर्णय

शहरातील प्रत्येक घराला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे जमिनीचे वाद कायमचे मिटण्यास मदत होणार आहे. जमिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड अर्थात व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असणार आहे. यामुळे राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल होणार आहे. प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख देण्याचा प्रस्ताव आहे. ग्रामीण भागातील जमिनींसाठी ७/१२ उताऱ्याप्रमाणेच नगर भूमापन क्षेत्रातही स्वतंत्र नोंदीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सध्या ग्रामीण भागात जमिनींसाठी ७/१२ उतारा तर नगर भूमापन क्षेत्रात मिळकत पत्रिका उपलब्ध आहे. मात्र इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या हक्कांची स्वतंत्र व एकसमान नोंद करण्याची स्पष्ट व्यवस्था सध्या नाही. त्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करण्यासाठी २०२६ चे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सदनिकानिहाय नोंदीची नवी व्यवस्था

या प्रस्तावित व्यवस्थेनुसार, प्रत्येक सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे तसेच इमारतीचे व खुल्या जागांसह रस्त्यांखालील सामाईक क्षेत्राची स्वतंत्र नोंद केली जाईल. प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाईल. नगर भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी D-१ आणि प्रत्येक सदनिकेसाठी D-२ हे नमुने प्रस्तावित आहेत, तर ग्रामीण व इतर क्षेत्रांत इमारतीसाठी I-A (गाव नमुना ७-क) आणि सदनिकेसाठी I-B (गाव नमुना ७-ड) हे नमुने वापरण्यात येणार आहेत.

पात्रतेचे निकष मंजूर बांधकाम आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे व नोंदणीकृत दस्तऐवजांच्या पडताळणीवर आधारित असतील आणि त्या अंतिम मंजूर आराखड्याच्या मर्यादेतच घेतल्या जातील. अभिलेख सुरू करण्याचा टप्पा नवीन प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि विद्यमान इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र व नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे ठरणार आहे. जमीनधारक, प्रवर्तक, विकासक, सदनिकाधारक किंवा संस्थेची अधिकृत व्यक्ती अर्ज करू शकेल.

हरकती, अर्जप्रक्रिया आणि अपेक्षित फायदे

मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांचे परीक्षण करून नियम अंतिम केले जातील. पुढे प्रायोगिक अंमलबजावणी करून या योजनेचा टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. बँक कर्ज, गहाण, मालमत्ता कराची थकबाकी, संस्थेची देणी, न्यायालयीन निर्बंध व शासकीय देणी यांची लागू प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकरणाच्या आदेश अथवा प्रमाणित माहितीच्या आधारे सदनिकानिहाय नोंद प्रस्तावित आहे.

अर्ज, माहिती संकलन, स्वयंचलित छाननी, आवश्यक स्थळपडताळणी, त्रुटींची पूर्तता, अभिलेख मंजुरी आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त कार्ड वितरणासाठी एकात्मिक ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाईल. नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे, महारेरा आणि भूमि अभिलेख प्रणालींमध्ये कालबद्ध डिजिटल माहितीची देवाणघेवाण प्रस्तावित आहे. इमारत पाडणे, पुनर्विकास किंवा पुनर्बाधणी झाल्यास जुन्या नोंदी नियमानुसार बंद अथवा अद्ययावत करून नवीन मंजूर आराखड्यानुसार अभिलेख तयार केले जातील.

या प्रस्तावामुळे सदनिकांच्या हक्कांची पडताळणी, खरेदी-विक्री व कर्ज प्रक्रिया सुलभ होणे, बोजे व थकबाकीची पारदर्शकता वाढणे, फसवणूक व वाद कमी होण्यास मदत होणे आणि शासकीय अभिलेख अद्ययावत राहणे अपेक्षित आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance