सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. अनेकदा कर्मचारी काम करण्यास उशीर करत असल्यामुळे सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लोकसेवा हक्क कायद्यात बदल
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यात बदल करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांची कामे विनाकारण रखडवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
आधी कारवाईची स्पष्ट तरतूद नव्हती
यापूर्वी लोकसेवा हक्क कायद्यामध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद नव्हती. त्यामुळे अनेकदा कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई होत नव्हती आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता. आता कायद्यात सुधारणा झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. कामात जाणूनबुजून उशीर केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा