सकाळची सुरुवात अनेकांसाठी कॉफीशिवाय होत नाही. पण याच कॉफीचा वापर भांडी घासण्यासाठीही करता येतो, असा एक उपाय सध्या परदेशात चर्चेत आहे. कॅनडा आणि अमेरिकेत हा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. या उपायाने जळलेली आणि चिकट झालेली भांडी पुन्हा चकाचक करता येतात, असे सांगितले जाते.
पेस्ट कशी तयार करावी
एका लहान वाटीत दोन मोठे चमचे वापरलेला कॉफीचा चोथा घ्या. त्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल, तर त्यात थोडे कोमट पाणी घालता येते. पेस्ट खूप पातळ किंवा खूप कोरडी होणार नाही, याची काळजी घ्या.
कॉफी पावडरमध्ये छोटे-छोटे दाणे असतात. हे दाणे कडक असतात. हे दाणे घासल्याने भांड्याचा चिकटपणा सहज निघू शकतो. यासोबत डिशवॉशिंग लिक्विड तेल आणि ग्रीस साफ करण्यास मदत करते.
भांडी कशी घासावी
सर्वात आधी तयार केलेली पेस्ट घाणेरड्या भांड्यावर लावा. त्यानंतर स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सामान्य स्पंजच्या साहाय्याने गोलाकार हालचाली करत हलक्या हाताने घासा. खूप जास्त जोर लावण्याची गरज नाही. जेव्हा तेल निघू लागेल, तेव्हा भांडे स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. भांड्यावर कॉफीचा कोणताही अंश शिल्लक राहणार नाही, याची खात्री करा.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी. कॉफी खरखरीत असते, त्यामुळे काही पृष्ठभागांवर घासल्यास त्यावर ओरखडे पडू शकतात. म्हणून हे मिश्रण सर्व प्रकारच्या भांड्यांवर वापरू नये. टेफ्लॉन किंवा नॉन-स्टिक भांडी, पॉलिश केलेले ॲल्युमिनियमचे साहित्य किंवा नॉन-स्टिक सिरॅमिक भांड्यांवर याचा वापर टाळावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा