दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते महेश बाबू यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यांचा भाचा सिद्धार्थ गल्ला याचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सिद्धार्थने आपली दक्षिण कोरियातील मैत्रीण ह्यॉन किम हिच्याशी लग्न केले. पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार हा सोहळा पार पडला. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.
केवळ जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोहळा
या विवाह सोहळ्याला गल्ला आणि घट्टामनेनी कुटुंबातील जवळचे सदस्य तसेच वधूचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नाचे फोटो महेश बाबू यांची बहीण मंजुला घट्टामनेनी यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. त्यांनी एकूण सात फोटो पोस्ट केले. मात्र या सातपैकी एकाही फोटोत महेश बाबू किंवा त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर दिसले नाहीत. त्यामुळे अभिनेता भाच्याच्या लग्नाला का आला नाही, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. सिद्धार्थ हा माजी खासदार आणि उद्योगपती गल्ला जयदेव यांचा धाकटा मुलगा आहे. लग्नासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते आणि मित्रपरिवारही सोहळ्यात सहभागी झाला होता. पसरत असलेल्या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘वाराणसी’च्या कामात व्यस्त महेश बाबू
महेश बाबू सध्या एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलणार असल्याच्या चर्चाही सध्या रंगल्या आहेत. चाहते चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा