नव्वदच्या दशकात मोठ्या पडद्यावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली होती. २०२५ मध्ये झालेल्या महाकुंभाच्या दरम्यान ती पुन्हा चर्चेत आली. त्यानंतर तिने स्वतःच सांगितले की, तिने आता अध्यात्माची वाट निवडली आहे. आता एका मुलाखतीत तिने केलेल्या दाव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. सलग पाच वर्षे अखंड मंत्रजप केल्यानंतर तिला साक्षात गणपती बाप्पांचे दर्शन झाल्याचा दावा तिने केला आहे.
शिक्षकांच्या सांगण्यावरून सुरू झाला जप
मुलाखतीत ममता कुलकर्णीने सांगितले की, शाळेत असताना तिच्या एका शिक्षकांनी तिला सांगितले होते की, सलग पाच वर्षे गणपती मंत्राचा जप केल्यानंतर बाप्पांचे दर्शन होते. तेव्हा ती लहान मुलगी होती, तरी तिने शिक्षकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पाच वर्षे कोणताही खंड न पडता मंत्राचा जप करत राहिली. त्यानंतर एके दिवशी सकाळी तिच्या समोर साक्षात गणपती बाप्पा उभे असल्याचे तिने सांगितले.
२५ वर्षांची तपस्या
ममता कुलकर्णीने मुलाखतीत असेही सांगितले की, तिने तब्बल २५ वर्षे तपस्या केली आणि सर्वकाही सोडून दिले. तिने शाळेच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटले की, विलेपार्ले येथे एक स्मशानभूमी होती आणि मुलांना घेण्यासाठी शाळेची बस तेथेच थांबायची. तिची नजर कायम त्या स्मशानभूमीकडेच असायची. ती सेंट जोसेफ कॉन्वेंट, विले पार्ले जुहू या शाळेत जवळपास दहा वर्षे होती. बॉलिवूड सोडून अध्यात्म स्वीकारलेली ममता आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी तिच्या वक्तव्यांमुळे ती कायम चर्चेत राहते.
प्रतिक्रिया व्यक्त करा