देशातील हवामानात सतत चढ-उतार होत आहे. काही राज्यांत थंडीचा कहर आहे, तर काही ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे. हवामान खात्याने २६ नोव्हेंबर रोजी पाच राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हवामानात बदल होत आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे थंडी, यामुळे नागरिकांचा हाल होत आहे.
कोणत्या राज्यांत पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि केरळमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रात थंडीची प्रतीक्षा लांबली
महाराष्ट्रात मात्र थंडीची प्रतीक्षा लांबली आहे. आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा परिणाम झाल्याने पुढील चार ते पाच दिवस तापमानात मोठे बदल होणार नाहीत. नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुणे शहरासह राज्यात अद्याप अपेक्षित थंडी जाणवत नाही. काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन गारठा वाढला होता, मात्र आता पुन्हा थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव मंदावला असून, आग्नेय व पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे. या बदलत्या वाऱ्यांचा प्रवाह आणि एल निनोच्या स्थितीमुळे रात्रीचे तापमान चढेच राहत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा