पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर बुधवारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कोर्टाच्या समोर बंदूका आणि गोळ्या पडल्याचे दिसून आले. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा जण होते. कोयते आणि बंदूका घेऊन हल्लेखोर आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि अशा गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे.
गर्दीच्या वेळी हल्ला, पिस्तूल आणि मॅगझीन सापडले
घटना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 च्या बाहेर घडली आहे. एकावर कोयत्याने आणि गोळीबार करत हल्ला करण्यात आला. घटनास्थळावर एक पिस्तूल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन सापडली आहे. कोर्टाच्या आवारात उभ्या असलेल्या वकिलांनी सांगितले की, याठिकाणी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला पोलिसांनी रिक्षात टाकून रुग्णालयात नेले. हा व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका गाडीवर तिघे तर दुसऱ्या गाडीवर चौघे जण आलेले होते. हल्लेखोरांकडे कोयते आणि बंदूका असल्याने परिसरात भीती पसरली.
पोलिसांकडून तपास सुरू, सीसीटीव्ही तपासणी
घटना घडल्यानंतर पोलीस काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. गोळीबारात जखमी झालेला व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. गोळीबार करणारा अज्ञात असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी पोहोचली असून आरोपींना शोधण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर तपास झाल्यावर माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा