कोल्हापूर : गोकुळ दूध संघाबाबत शासन नियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीला आव्हान देणारी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. शासन नियुक्त चार संचालकांनाही पुढील तारखेची नोटीस काढण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या वकिलांनी विनंती केल्यानंतर ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता ही सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीत नेमके काय घडले
आजच्या सुनावणीदरम्यान समविचारी आघाडीकडून दाखल केलेल्या मूळ याचिकेमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आणि अध्यक्ष निवडीसह घडलेल्या सर्व अद्ययावत गोष्टी रेकॉर्डवर आणण्याची परवानगी मागितली. मात्र याला महायुतीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. समविचारी आघाडीच्या विनंतीनंतर न्यायालयाने या विषयातील सर्व घटना अंतिम निर्णयाला अधीन असतील, हे स्पष्ट करत समविचारी आघाडीला मूळ याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली.
महायुतीच्या वकिलांकडून काही संचालकांना नोटीस मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला. त्यावर ही वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे का, असा प्रश्न करत न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना झापले. त्यानंतर महायुतीचे १२ आणि शासन नियुक्त चार अशा सर्वांना सर्व माध्यमातून नोटीस देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. ही नोटीस गोकुळ प्रशासनाने पाठवायची आहे. नोटीस पाठवूनही महायुतीचे १२ आणि शासन नियुक्त चार संचालक हजर झाले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालयाची सुनावणी सुरू होईल, हे न्यायालयाने आजच्या सुनावणीत स्पष्ट केले.
गोकुळ निवडणुकीची पार्श्वभूमी
राज्यभर गाजलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे १३ तर महायुतीचे १२ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्ष सतेज पाटील गटाचा होणार, असे निश्चित असताना शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून चार संचालकांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचा अधिकारही बहाल केला. शासनाने ऐनवेळी हा आदेश काढत चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केली आणि त्यांच्या मदतीने महायुतीचा अध्यक्ष गोकुळमध्ये बसला.
शासनाच्या या अध्यादेशाविरोधात सतेज पाटील गटाने न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने या चार संचालकांचे मतदानाचे अधिकार कायम ठेवले, परंतु ते वेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्यात यावेत, असा आदेश दिला. तसेच अध्यक्षपदाची ही निवडणूक न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहील, असेही स्पष्ट केले. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा