गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवा चित्रपट निर्मात्यांसाठीच्या ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमाचा समारोप झाला. देशभरातील 100 तरुण प्रतिभावंतांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. अवघ्या 48 तासांत चित्रपटाची संकल्पना मांडण्यापासून चित्रीकरण आणि सादरीकरणापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
पाच लघुपटांचे सादरीकरण, 15 विभागांत पुरस्कार
समारोप सोहळ्यात पाच संघांनी तयार केलेल्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. चित्रपट निर्मितीच्या विविध 15 विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘वन लास्ट स्टॉप’ या चित्रपटासाठी मोहक गांधी यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘अ लिटल समथिंग’साठी तमन्ना ठाकूर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरल्या, तर ‘शेल्स’मधील अभिनयासाठी सिद्धी पारकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला.
तांत्रिक विभागांतील विजेते
छायाचित्रणासाठी ‘वन लास्ट स्टॉप’च्या त्रियाशा मन्ना, तर संकलनासाठी ‘अ लिटल समथिंग’चे नयन चोटलिया आणि मानव अग्रवाल यांना पुरस्कार मिळाला. ‘शेल्स’साठी जितिन एस यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तर ‘टू सनसेट्स अँड झिरो सनराइझेस’साठी अश्विन अशोक यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखनाचा पुरस्कार देण्यात आला. ‘शेल्स’साठी श्री पार्वती एस यांना पार्श्वगायनाचा आणि ‘नील मछली’साठी अक्षय अनमोल कटोरे यांना संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. वेशभूषा आणि कला दिग्दर्शन या दोन्ही विभागांत ‘वन लास्ट स्टॉप’साठी सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल यांना गौरवण्यात आले. समारोप सोहळ्याला महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग यांच्यासह परीक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा