मिस युनिव्हर्स २०२६ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटोने विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या ७५ व्या पर्वात जगभरातील ११६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स फातिमा बॉश हिने जेनिफरच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढवला. या विजयामुळे प्यूर्टो रिकोला तब्बल २० वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळाला आहे. दरम्यान, भारताचे प्रतिनिधित्व करणारी काजिया लिझ मेझो विजेतेपदापासून दूर राहिली. तिने टॉप ३० पर्यंत मजल मारली; मात्र टॉप १२ मध्ये स्थान मिळवता आले नाही.
उपविजेत्या कोण ठरल्या?
या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ प्रथम उपविजेती ठरली, तर व्हेनेझुएलाची क्लारा वेगास द्वितीय उपविजेती ठरली. फिलिपाइन्सची बीया मिलान-विंर्डोस्की तिसऱ्या आणि न्यूझीलंडची जॉर्जिया वॅडिंग्टन चौथ्या क्रमांकावर राहिली. टॉप ५ मध्ये प्यूर्टो रिको, डॉमिनिकन रिपब्लिक, व्हेनेझुएला, फिलिपाइन्स आणि न्यूझीलंडच्या स्पर्धकांचा समावेश होता.
विवाहित आई म्हणून रचला इतिहास
जेनिफर बॅरेटोच्या विजयाचे विशेष महत्त्व आहे. मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकणारी ती पहिली विवाहित आई ठरली आहे. तिच्या या यशामुळे सौंदर्य स्पर्धेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला आहे. २७ वर्षीय जेनिफरकडे मानसशास्त्र आणि क्लिनिकल सोशल वर्क या विषयांतील उच्च शैक्षणिक पात्रता आहे. ती अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या क्षेत्रात प्रिव्हेन्शन स्पेशालिस्ट म्हणून काम करते.
जेनिफरने २०२१ मध्ये टेक्सासमधील फोर्ट हूड येथे अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. तिने कार्ल आर. डार्नल आर्मी मेडिकल सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे. तिचे काम प्रामुख्याने लष्करी कुटुंबांना मदत करणे, घरगुती हिंसाचार आणि बाल अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करणे तसेच समाजामध्ये जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे यांच्याशी संबंधित आहे. जेनिफरचे लग्न अमेरिकन लष्करातील सार्जंट यान कार्लोस बॅरेटो काल्डेरोन यांच्याशी झाले आहे. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा