बांगलादेशी फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. बांगलादेशचे प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचे निधन झाले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल खान ‘नसीब’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले होते. मात्र ते पुन्हा जिवंत घरी परतले नाहीत. शूटिंगच्या दिवशी सकाळी ते हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती समोर आली आहे.
नाश्त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले
सोहेल खान यांच्या निधनाची बातमी ‘नसीब’ सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते मोहम्मद इकबाल यांनी दिली आहे. त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, १८ नोव्हेंबर रोजी शूटिंगसाठी सोहेल खान बोगुरा येथे आले होते. आपल्या टीमसोबत सोहेल खान हॉटेल मोमो इन येथे थांबले होते.
सोहेल खान यांनी हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता केला होता. साडेआठच्या दरम्यान त्यांनी नाश्ता केला असल्याची माहिती आहे. त्यानंतर मजा मस्ती करत त्यांनी सर्वांसोबत गप्पा मारल्या. काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे दिग्दर्शकाने सांगितले.
रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
सोहेल खान यांना तातडीने टीएमएसएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून सोहेल खान यांना मृत घोषित केले. मोहम्मद इकबाल यांनी असेही सांगितले की, बुधवारपर्यंत सोहेल खान आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करणार होते. पण मंगळवारीच त्यांचे निधन झाले.
सोहेल खान यांच्या निधनाची बातमी समोर येताच बांगलादेशी सिनेइंडस्ट्रीला धक्का बसला आहे. खान कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बांगलादेश सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा