‘कोन बनेगा करोडपती’च्या १८ व्या सीझनला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. जळगावचे भूषण ठाकरे यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचून बाजी मारली. ज्ञानाच्या या खेळात नशीब आजमावण्यासाठी अनेक जण येतात, मात्र भूषण ठाकरे यांच्या जिद्दीची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.
भूषण ठाकरे यांनी ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली होती. सोनी टीव्हीने या शोचा खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मुलगा या टप्प्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खिशात २४ रुपये, स्वप्न मोठे
जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून भूषण ठाकरेंची ओळख आहे. त्यांची स्वप्ने खूप मोठी होती, मात्र परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे ते आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकले नव्हते. खिशात केवळ २४ रुपये घेऊन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणासाठी भूषण ठाकरे घराबाहेर पडले.
हलाखीच्या परिस्थितीत शिक्षक आणि भावाच्या मदतीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीपासूनच ‘कोन बनेगा करोडपती’ या शोमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न होते.
दहा वर्षांची जिद्द, अखेर यश
भूषण ठाकरे यांनी भरपूर प्रयत्न केले. गेल्या १० वर्षांत ‘कोन बनेगा करोडपती’ या शोमध्ये ते १० वेळा निवडले गेले होते. पण काही कारणांमुळे ते बादही झाले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि प्रयत्न सुरूच ठेवले.
जिद्द आणि चिकाटी कायम ठेवल्यामुळे २०२६ साली त्यांची ‘कोन बनेगा करोडपती’ या शोमध्ये निवड झाली. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून त्यांनी प्रत्येक प्रश्नाचा टप्पा पार केला आणि १ कोटी रुपयांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले.
भूषण ठाकरे यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी सांगितले की, आधी आईचे विकलेले दागिने परत घेणार आहेत. त्यांच्या या यशामुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा