रवि जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची पहिली झलक अखेर प्रेक्षकांसमोर आली आहे. चित्रपटाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता, त्यामुळे या चित्रपटात कोण झळकणार याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू होते. आता फर्स्ट लूक समोर आल्यानंतर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दिग्दर्शक रवि जाधव यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या झलकीत दोन अभिनेत्री दिसत आहेत. डोक्यावरचा पदर सारत त्या आपला चेहरा प्रेक्षकांसमोर आणतात. ढोलकीच्या तालावर त्या ठेका धरतात आणि लावणीचा ठसकेबाज अंदाज या झलकीतून दिसून येतो. घुंगरांचा आवाज आणि नृत्याची जुगलबंदी या फर्स्ट लूकचे खास आकर्षण ठरले आहे.
दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत
या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघींचा कातिल अंदाज फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळतो. या दोघींशिवाय चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे उर्वरित कलाकारांबद्दलची उत्सुकता कायम आहे.
रवि जाधव यांनी 2010 मध्ये ‘नटरंग’ हा चित्रपट दिला होता. त्या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्यामुळे ‘फुलवरा’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
14 जानेवारी 2027 ला प्रदर्शन
फर्स्ट लूक शेअर करताना रवि जाधव यांनी लिहिले आहे की, अस्सल लावणी सादर करत हा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या झलकीत मथुरा आणि संगीता परीतेकर यांची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स यांच्या निर्मितीखाली तयार होत असलेला हा चित्रपट 14 जानेवारी 2027 पासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा