खेडेगावातील एक म्हातारी सगळं सोडून पंढरीला जायचं म्हणते, पण तिचा निश्चय आणि निर्धार काही केल्या होत नाही. संसाराच्या लहान-मोठ्या चिंतेने तिचे पाऊल पुढे पडत नाही. शरद पवारांचेही पाऊल निवृत्तीच्या दिशेने पडताना दिसत नाही. त्यांची ऊर्जा आणि शक्ती इतकी प्रबळ आहे की, पंढरीला निघालेली वारी पुन्हा घरी परतण्यासारखी अवस्था झाली आहे. निवृत्तीच्या चर्चांना सुरुवात होते, पण पुढे काही होत नाही. मात्र यावेळेला ते निवृत्ती घेतील, असे अनेकांना वाटते.
२०२३ ची घोषणा आणि माघार
यापूर्वी पक्षात नवे नेतृत्व तयार झाले की मी निवृत्ती घेईन, असे ते म्हणाले होते. सन २०२३ मध्येही त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, पण नंतर ती मागे घेतली होती. म्हणजे त्या खेड्यातील स्त्रीप्रमाणेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय सदैव मागे टाकला जात आहे. आताही अनेकांना शरद पवार हे काहीतरी करून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलतील, असे वाटते. शरद पवार राजकारण सोडतील, असे लोकांना वाटत नाही.
नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा
शरद पवार यांचा आदर्श खरे तर इतरही नेत्यांनी घ्यायला हवा. निवृत्तीच्या निर्णयांनी पक्षातील प्रतीक्षेत असलेल्या नव्या नेतृत्वाला आनंद होत असतो. आता आपला नंबर लागेल, असे त्यांना वाटते. हे नवे लोक आधीपासून भावी नेतृत्व म्हणून तयारी करू लागलेले असतात. पण शरद पवार काही निवृत्ती घेत नाहीत, त्यामुळे अशा नेत्यांनाही त्यांच्या मागेमागेच राहावे लागते. त्यामुळे इतर नेत्यांनी फार आशावादी राहू नये, कारण शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय फारसा खरा ठरेल, असे वाटत नाही. हे म्हणजे पावसाळ्यातील ढगांसारखे झाले. गडगडाट भरपूर, विजांचा कडकडाटही भरपूर, पण पाऊस पडेलच याची खात्री नसते. उलट त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेने इच्छुक नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि काही क्षणांतच ते पुन्हा पूर्ववत होतात. त्यामुळे निवृत्तीपेक्षा त्यांच्या पुढच्या राजकीय खेळीची उत्सुकता अनेकांना असू शकते. कारण पंढरीची वाट धरलेले वारकरी परत येऊ शकतात; पण पवार यांच्या राजकीय वाटचालीचा मुक्काम कुठे असेल, हे सांगणे भल्याभल्यांना जमलेले नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा