जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोठी पावले उचलली आहेत. रियासी जिल्ह्यातील तब्बल ३० दहशतवादी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले असून, तिथे ते भारताविरुद्धच्या कारवायांसाठी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेत असल्याचा धक्कादायक खुलासा जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी बुधवारी केला. हे सर्वजण १९९१ ते २००३ या कालावधीत बेपत्ता झाले होते.
दहशतवादाला खतपाणी घालणारे जाळे
पोलिस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महोर पोलिस ठाण्याला विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की, महोर आणि चासाना परिसरातील सुमारे ३० दहशतवादी शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेले आहेत. हे सर्वजण सध्या पाकिस्तानात राहून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ते सीमेपलीकडून शस्त्रे, दारूगोळा आणि पैसा पुरवत आहेत. याशिवाय, स्थानिक तरुणांना भडकावून आणि त्यांची मने वळवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्याचे कामही हे दहशतवादी करत असल्याचे महासंचालकांनी स्पष्ट केले.
नावे जाहीर, जमीन जप्त
पोलिसांनी या सर्व ३० दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. महोर पोलिसांनी २०२४ मध्ये या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहिता, स्फोटक पदार्थ कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांना बळ देण्यासाठी यापैकी पाच जण जम्मू-काश्मीरमधील आपल्या मालकीची जमीन विकण्याच्या प्रयत्नात होते. जमीन विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादासाठी केला जाणार होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत या पाच जणांची २७ कनालहून अधिक जमीन जप्त केली असून, दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या या कारवाईमुळे दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा