१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आजही आषाढी एकादशीच्या दिवशी हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. मात्र, प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक संकटांचा सामना करणारी एक वेदनादायी कहाणी दडली आहे. चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब घाटगे यांना या सिनेमासाठी मोठा आर्थिक फटका बसला. मुहूर्ताच्या दिवशीच प्रमुख अभिनेत्याच्या निधनाची बातमी आली, तर चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला. या सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी अखेर हा चित्रपट पूर्ण केला.
मुहूर्ताच्या दिवशीच आली निधनाची बातमी
२१ जून १९८४ रोजी आळंदी येथे चित्रपटाचा मुहूर्त ठरला होता. दिग्दर्शनाची जबाबदारी रमाकांत कवठेकर यांच्याकडे होती. आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीचे चित्रीकरण दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने अवघ्या २५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. सगळ्या कलाकारांची आणि तंत्रज्ञांची तयारी झाली होती. मात्र, टीम ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांची वाट पाहत होती. त्याचवेळी अण्णासाहेब घाटगे यांच्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन आला. फोनवर बोलल्यानंतर त्यांच्या हातातील रिसीव्हर खाली पडला आणि ते जागेवरच बसले. कारण फोनवर अरुण सरनाईक यांच्या अपघाती निधनाची बातमी देण्यात आली होती. या बातमीने संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला.
७० टक्के चित्रीकरणानंतर अभिनेत्रीचा अपघात
अरुण सरनाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोणाला घ्यायचे, हा मोठा प्रश्न निर्मात्यांसमोर होता. अखेर ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर रंजना देशमुख आणि श्रीकांत मोघे यांना घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. आळंदी ते पंढरपूर वारीचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत जवळपास ७० टक्के चित्रपट तयार झाला होता. मात्र, चित्रपटाचे शेवटचे दहा दिवसांचे चित्रीकरण बाकी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली. दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जात असताना अभिनेत्री रंजना यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यांना चालणेही कठीण झाले.
रंजना पुन्हा बऱ्या होतील आणि चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण करता येईल, या आशेने अण्णासाहेब घाटगे यांनी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली. मात्र, रंजना पुन्हा पूर्वीसारख्या काम करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्यांनीच निर्मात्यांना दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रंजना यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची निवड करण्यात आली, तर श्रीकांत मोघे यांच्या जागी बाळ धुरी यांना घेण्यात आले. आधीच ७० टक्के पूर्ण झालेल्या चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
आयुष्यभराची कमाई पणाला लावून चित्रपट पूर्ण
‘पंढरीची वारी’ हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांनी आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. त्या काळात या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास १८ लाख रुपये खर्च झाले होते. अरुण सरनाईक यांचे निधन, रंजना यांचा अपघात, कलाकारांमधील बदल आणि पुन्हा करावे लागलेले चित्रीकरण अशा अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला. अनेकांनी त्यांना हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विठ्ठलावरची श्रद्धा आणि चित्रपट पूर्ण करण्याची जिद्द यामुळे अण्णासाहेब घाटगे यांनी माघार घेतली नाही. अखेर ८ डिसेंबर १९८८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेक संकटांवर मात करून तयार झालेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी जोग, राजा गोसावी, अशोक सराफ आणि राघवेंद्र कडकोळ यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली.
प्रतिक्रिया व्यक्त करा