झाडांवर चिवचिवट करणारे पक्षी आपण नेहमीच पाहतो. पक्षी परिसरातील आवाजांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. ते आसपासचा धोका लवकर ओळखतात आणि एका विशिष्ट आवाजाने इतर पक्षांना धोक्याची सूचना देतात. माणसांसह अनेक सस्तन प्राण्यांना डोक्याच्या दोन्ही बाजूला कान असतात. पण पक्ष्यांना असे बाहेरून दिसणारे कान नसतात. मग त्यांना आवाज कसा ऐकू येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी निसर्गाने एक खास रचना केली आहे.
डोळ्यांमागे लपलेली श्रवणरचना
पक्ष्यांना माणसांसारखे किंवा सस्तन प्राण्यांसारखे बाह्य कान नसतात. त्यांच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला, साधारणपणे डोळ्यांच्या मागे आणि किंचित खालील बाजूला, श्रवणेंद्रिय असतात. ही छिद्रे बाहेरील बाजूने सहज दिसत नाहीत, कारण त्यावर मऊ, बारीक पिसे असतात. या पिसांमुळे कानाच्या छिद्रांचे धूळ, कचरा आणि इतर बाह्य घटकांपासून संरक्षण होते. ध्वनीलहरींना आत जाण्यास पिसांमुळे अडथळा येत नाही. या कानांना हवेच्या झोताचा किंवा धुळीचा त्रास होत नाही.
उड्डाणात हाच फायदा
पक्ष्यांना बाह्य कान नसल्यामुळे त्यांना एक मोठा फायदा होतो. हवेत झेप घेताना आणि शारीरिक हालचाल करताना त्यांना अडथळा येत नाही. जर त्यांना बाहेर मोठे कान असते, तर आकाशात उडताना हवेचा वेग आणि घर्षण वाढले असते. त्यामुळे त्यांचा हवेतील वावर सहज सोपा झाला नसता आणि वेगावरही परिणाम झाला असता. यामुळेच निसर्गाने त्यांना गुळगुळीत आणि सुटसुटीत रचना दिली आहे. ध्वनीलहरी या लपलेल्या छिद्रांमधून आतील कानापर्यंत पोहोचतात. तिथे आवाज ओळखणाऱ्या पेशी असतात. त्यांच्या मदतीने मेंदूकडे संदेश पाठवला जातो. त्या आधारे पक्षी आवाज ओळखतात, दिशा ठरवतात आणि संवादासोबतच धोक्याचीही चाहूल त्यांना मिळते.
शिकारीसाठीही श्रवणशक्ती महत्त्वाची
पक्ष्यांसाठी आवाज ओळखणे हे केवळ संवादासाठीच नाही, तर शिकारीसाठीही महत्त्वाचे ठरते. पक्षी त्यामाध्यमातून जोडीदाराला साद घालतो, पिलांचे आवाज ऐकतो आणि भक्ष्याची हालचाल टिपतो. संभाव्य धोक्यापासून सावध राहण्यासाठीही श्रवणशक्ती महत्त्वाची ठरते. रात्री सक्रिय राहणाऱ्या किंवा शिकार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये श्रवणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असते. बाह्य कान नसताना एका विशिष्ट रचनेमुळे ऐकण्याची ही किमया साधली जाते.
Leave a Reply