बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील स्टीलचे नळ सतत वापरले जात असल्यामुळे त्यावर पाण्याचे डाग, साबणाचे थर आणि पांढरे डाग जमा होतात. पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास नळावर पांढरट थर तयार होतो. त्यामुळे चमकदार नळ काही दिवसांतच जुने आणि अस्वच्छ दिसू लागतात. अनेकदा महागडे क्लिनर वापरूनही हे डाग पूर्णपणे निघत नाहीत. मात्र घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंच्या मदतीने स्टीलचे नळ स्वच्छ आणि चमकदार ठेवता येतात.
डाग काढण्यासाठी ७ सोपे उपाय
पाण्यामुळे तयार झालेले पांढरे डाग काढण्यासाठी व्हिनेगर उपयोगी ठरू शकते. एका भांड्यात समान प्रमाणात पाणी आणि पांढरे व्हिनेगर मिसळा. या मिश्रणात मऊ कापड भिजवून नळावर हलक्या हाताने पुसा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने नळ पुसून कोरडा करा.
नळावर साबणाचे थर किंवा तेलकटपणा जमा झाला असेल, तर डिशवॉश लिक्विड वापरता येते. एका कप पाण्यात काही थेंब डिशवॉश मिसळा आणि मऊ स्पंजने नळ स्वच्छ करा. हट्टी डागांसाठी थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट मऊ कापडावर घेऊन डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने लावा. मात्र जोरात घासू नका, नाहीतर नळाच्या फिनिशिंगवर ओरखडे पडू शकतात.
लिंबाच्या रसात नैसर्गिक आम्ल असते. पाण्यात लिंबाचा रस मिसळून मऊ कापडाने नळ पुसा आणि लगेच स्वच्छ पाण्याने धुवा. नळाच्या तळाशी, जोडणीच्या ठिकाणी आणि हँडलच्या आजूबाजूला जमा झालेली घाण काढण्यासाठी मऊ ब्रिसल्स असलेला जुना टूथब्रश वापरता येतो. नळाच्या तोंडाशी असलेल्या जाळीदार भागाला एरेटर म्हणतात. त्यात क्षार आणि घाण साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे तो काढून स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा योग्य पद्धतीने बसवा.
चमक टिकवण्यासाठी काय करावे?
नळ वापरल्यानंतर त्यावर पाण्याचे थेंब तसेच राहिल्यास काही वेळाने पांढरे डाग तयार होतात. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर मऊ आणि कोरड्या मायक्रोफायबर कापडाने नळ पुसून घ्या. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मऊ कापडाने नळ पुसा. नळावर साबणाचे थर किंवा पाण्याचे डाग दिसताच ते स्वच्छ करा आणि नळाच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
Leave a Reply