निवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम, क्लेमची सद्यस्थिती आणि पैसे कधी जमा होतील, याची माहिती मिळवण्यासाठी आता ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारकांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असे तपासा ऑनलाईन पेन्शन स्टेटस
ईपीएफओच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेन्शनधारक खालील टप्प्यांआधारे आपल्या पेन्शनची स्थिती तपासू शकतात. सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर, epfindia.gov.in वर जा. मुख्य पृष्ठावरील Online Services या पर्यायात जाऊन Pensioners Portal निवडा. नवीन पृष्ठ उघडल्यावर Know Your Pension Status हा पर्याय निवडा. त्यानंतर संबंधित कार्यालय, कार्यालयीन आयडी आणि तुमचा पीपीओ क्रमांक बिनचूक नोंदवा. सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर Get Status यावर क्लिक करा. त्यानंतर पेन्शन पेमेंट आणि सद्यस्थितीचा तपशील लगेच स्क्रीनवर दिसून येईल.
पासबुक आणि क्लेम स्टेटसही ऑनलाईन
ज्या सदस्यांनी पेन्शन क्लेमसाठी अर्ज केला आहे, ते UAN आणि पासवर्डच्या मदतीने पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे क्लेमची स्थिती तपासू शकतात. डिजिटल सेवांमुळे पेन्शन वितरण प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आली आहे. बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब झाल्यास त्यामागील कारणही समोर येते.
पेन्शनधारकांनी या गोष्टी लक्षात ठेवा
पेन्शन सुरळीत सुरू राहण्यासाठी पेन्शनधारकांनी आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे ईपीएफओ कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही. पेन्शनधारकांनी बँक खाते आणि आधार तपशील अद्ययावत ठेवावा, पीपीओ क्रमांक लक्षात ठेवावा आणि ईपीएफओकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना आणि माहितीकडे लक्ष द्यावे.
Leave a Reply