राज्यात महायुतीची सत्ता एकत्रपणे पुढे जात असली, तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या सत्तेत दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी गावागावांत, शहराशहरांत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू आहे.
उल्हासनगरमधील कार्यक्रमावरून वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम खासगी असला तरी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांना निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी जुन्या शिवसेनेसोबत काम करताना कधीही त्रास झाला नाही, मात्र पक्षात नव्याने आलेले काही लोक वारंवार महायुतीत अडथळे आणत आहेत, असे म्हणत शिंदे गटाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र सत्ताधारी शिवसेना अनुपस्थित राहिल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे-पालघरमधील वर्चस्वाची लढाई
मुंबई शेजारी असलेला ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. कधी काळी शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या ठाण्यात आता शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी भाजप सोडत नाही. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका असो किंवा उल्हासनगर महापालिका असो, तेथे वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपचे मंत्री गणेश नाईक आघाडीवर असतात, त्यानंतर आमदार संजय केळकर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नावे घेतली जातात. ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तसा आता तो भाजपचा झाला आहे.
गेल्याच आठवड्यात पालघर जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी घडामोड घडली. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वनगा २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून ते नाराज असल्याचे दिसून येत होते. आगामी काळात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे वनगा यांना बळ देतील, असे सांगितले जात आहे. तिकडे कोकणात सुनील तटकरे यांचे होमपिच असलेल्या रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
साताऱ्यातील बँक निवडणूक आणि आरोप-प्रत्यारोप
साताऱ्यात जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आला, तर उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचा झाला. भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्तेपासून दूर ठेवले. बँकेच्या निवडणूकीच्या निकालानंतर भाजपने पुढे काय होते हे पाहा, असा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या कथित आरोपांमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते रामदास कदम, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धा सगळ्यांनी पाहिली.
Leave a Reply