राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चा सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चावरून पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विदर्भातील नेत्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये, अशा सूचना प्रदेश पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मोर्चा कशासाठी?
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विदर्भातील नेत्यांना या मोर्चात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातूनच मोर्चाला अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
अमर काळे यांची पोस्ट चर्चेत
या पार्श्वभूमीवर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी निघणारा मोर्चा महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते मोर्चात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सहभागाबाबत स्पष्ट घोषणा केलेली नसल्याने त्यांच्या पोस्टचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. एकीकडे प्रदेश पातळीवरून विदर्भातील नेत्यांना मोर्चापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्याची चर्चा असताना, दुसरीकडे खासदार अमर काळे यांनी रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन दर्शविल्याने पक्षातील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या मोर्चाला पक्षातील नेत्यांचे कितपत समर्थन मिळते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
इतर घडामोडींकडे लक्ष
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समावेश होण्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाला पक्षाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष दिले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा आणि खासदार अमर काळे यांची भूमिका पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, मोर्चाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका आणि अमर काळे यांचा प्रत्यक्ष सहभाग याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
Leave a Reply